सोलापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. रविवारी जिल्ह्यात एकूण 121 नवे रुग्ण आढळले आहेत. यात शहरी भागात 86 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या एकूण 4 हजार 99 वर पोहचली आहे. यामध्ये 3 हजार 249 रुग्ण शहरीभागात आढळले आहेत. तर 850 रुग्ण हे ग्रामीण भागात आढळले आहेत.
रविवारी ग्रामीण सोलापूरात 184 अहवाल प्राप्त झाले. यात 151 निगेटिव्ह तर 33 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. 2 बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची एकुण संख्या 850 असून आजपर्यंत 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 474 जणांवर उपचार सुरू असून 340 जण बरे झाले आहेत.
सोलापुर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी 398 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले होते. त्यामधून 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 49 पुरुष व 39 महिलांचा समावेश आहे. 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत एकूण 303 रुग्ण दगावले आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 16 जुलै ते 26 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.