पंढरपूर -परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाळिंबाची उत्तर भारतात वाहतूक केली आहे. मागील महिन्यात सुरू झालेल्या किसान रेल्वेद्वारे डाळींबांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेल्वेने वाहतूक केलेल्या एकूण नाशवंत मालांपैकी 61 टक्के वाहतूकही डाळींबाची करण्यात आली आहे. मागील एका महिन्यात सुमारे अकराशे टनांहून अधिक डाळिंबाची वाहतूक झाली आहे.
किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नाशवंत माल जसे डाळिंब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरवी मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्यांची वाहतूक केली जात आहे. प्रामुख्याने सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून वाहतूक करण्यात येत आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी ११२७.६७ टन डाळिंबाची वाहतूक केली आहे. ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे.
किसान रेल्वे साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आहे. सांगोला तसेच पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. कृषिमंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजी डिलेव्हरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही. रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त गेले जात आहे.