सिंधुदुर्ग - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेतील सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देऊन पिढीत मुलीला न्याय द्या, अशी मागणी सत्यशोधक महिला आघाडी, महाराष्ट्र या संघटनेने केली आहे. सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार यांच्यासह सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आले. त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हे निवेदन सर्वत्र एकाचवेळी दिले आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारी अॅड. स्वाती तेली, अमोल कांबळे, अॅड. सुदीप कांबळे, विवेक ताम्हणकर, दीपा ताटे, वर्षाराणी जाधव, दया आजवेलकर, अंकिता कदम, लता कोरगावकर, दीपक जाधव, प्राध्यापक सचिन वासकर आदी उपस्थित होते.
सध्याचे सरकार जरी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत असले तरी ते सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे. जेथे गाईला सुरक्षितता आहे, पण बाईला नाही अशा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. सध्याचे सरकार स्त्रियांना राजकारणात प्रवेश दिला असल्याचा दावा करत असले तरीदेखील स्त्रियांविषयी बाळगली जाणारी त्यांची मानसिकता ही जातिव्यवस्था व पितृसत्ता समर्थकच कायम राहते. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या आणि अमानवी हिंसा करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - सिंधुदुर्गात 'ब्लॅक पँथर'चे दर्शन...आंबोली वनपरिक्षेत्रात वावर
या घटनेतील सर्व आरोपींना कठोरात-कठोर शिक्षा देण्यात यावी. पीडितेवरील हिंसाचाराची तत्काळ एफआयआर नोंद करून न घेणाऱ्या पोलीस अधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांची तत्काळ चौकशी करण्यात यावी. वाढत्या स्त्री हिंसाचाराच्या विरोधात शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. जलदगती न्यायालयामार्फत हा खटला चालवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला स्थगिती; सिंधुदुर्गातील स्वयंसहायता समूहातील महिला आक्रमक