सिंधुदुर्ग - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची बदली ही राजकीय असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी केला आहे.
या षडयंत्रामागे शिवसेना खासदार, आमदार, पालकमंत्री यांचा हात आहे, असे ते म्हणाले. डॉ.चव्हाण यांनी गेल्या दोन महिन्यांत चांगले काम केले. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील उपचार पद्धतीत आमुलाग्र बदल केले आहेत. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी स्वार्थासाठी श्रीमंत चव्हाण यांची बदली केल्याचा आरोप वंचितच्या नेत्यांनी केलाय. ही बदली रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कणकवलीतील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस प्रमोद कसले, युवक आघाडी अध्यक्ष तेजस पडवळ, जिल्हा संघटक संदीप जाधव, तालुकाध्यक्ष संजय जाधव, सावंतवाडी शहराध्यक्ष प्रदीप कांबळे, सचिन तांबे आदी उपस्थित होते.
डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची पालकमंत्र्यांनी कोणत्या करणातून बदली केली. त्यांचे काम उत्तम आहे. मेडिकल कॉलेजसाठी ९५० कोटी मंजूर आहेत. या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी शिवसेनेला आपल्या हातातील बाहुले हवे आहे,असे परुळेकर म्हणाले. त्यामुळे हे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनामुळे जिल्ह्यात १४० लोकांचा मृत्यू झाला. मात्र गेल्या दोन महिन्यांत डॉ. चव्हाण यांच्या कारकिर्दीत अवघे ४० जण मृत्यू झाले आहेत. योग्य प्रकारे उपचार केल्यानेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी हा आकडा साधला आहे.
खासगी डॉक्टरांना पाठिशी घालण्याचे षडयंत्र
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी काही खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली आहे. काही परवानगी न घेता या हॉस्पिटलमध्ये मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांना पाठिशी घालण्यासाठी राजकीय दबावातून ही बदली करण्यात आली आहे. गर्भनिदान करणाऱ्या मशिनरी अनेक हॉस्पिटलमध्ये लावण्यात आल्या आहेत. बाहेर गर्भ निदान होणार नाही, असे बोर्ड लावण्यात येतात. मात्र जिल्ह्यात मुलीचा दर ९४० वर आला आहे.
बदली थांबवा...अन्यथा वंचित आंदोलन करणार
अनेक मुलींना खासगी डॉक्टर मारत आहेत. जर त्यांची बदली झाली, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यात उतरेल, असा इशारा वंचितने दिला. कोविड काळात दोन मतप्रवाह होते. काही खासगी डॉक्टरांनी चांगले कामही केले. कुडाळात महिला हॉस्पिटल उभारुन अद्याप उद्घाटन नाही. सत्ताधारी जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे पदभार दिला. पण त्यांनी किती शस्त्रक्रिया केल्या? याची माहिती लोकांना द्यावी, अशी मागणी महेश परुळेकर यांनी केली.