मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून विजयाचा डंका मिरवणाऱ्या महायुतीत मात्र मुख्यमंत्री पदावरून खलबत्तं सुरूच आहेत. "मुख्यमंत्री पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. पक्षाचे तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील," असं वारंवार महायुतीकडून सांगितलं जातं आहे. मात्र तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू झाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जावं यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढला आहे. भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नावाला वाढता दबाव : 15 व्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस झाले, तरी सुद्धा महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप तिढा सुटला नाही. हा निर्णय आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठून रात्री उशिरा अमित शाह यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी अमित शाह आज मुंबईत येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जोरात असून देवेंद्र फडणवीस यांना 5 अपक्ष आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ १३७ वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडं 15वी विधानसभा निवडणूक 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीला घवघवीत यश भेटलं. यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच दावेदार आहेत, असा वाढता दबाव एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत असल्याचं दिसत आहे. यासाठी सोमवारी राज्यभरात अनेक ठिकाणी महिलांनी देवाला साकडं सुद्धा घातलं.
महायुतीत कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही : भाजपा पक्षाकडून देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. भाजपाचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आले असून त्यांना 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या 41 आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही देवेंद्र फडवणीस यांच्या नावाला पाठिंबा असल्यानं मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री, असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितल्यानं मुख्यमंत्री पदावर आपलाच दावा असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यातच आपल्या नेतृत्वातच महायुतीला भक्कम यश मिळाल्यानं मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष आपल्याला भेटायला हवीत, असा एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा त्याग : मुख्यमंत्री पदाचा हा पेच दिल्ली दरबारी पोहोचला असून भाजपा पक्ष श्रेष्ठींकडून यावर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल, याबाबत मोठ्या प्रमाणात विचार मंथन सुरू आहे. भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना नाराज करायचं नाही. तर दुसरीकडं 2014 पासून देवेंद्र फडणवीस यांनी सतत भाजपाला राज्यात शंभरी पार मतं मिळवून दिली. संख्याबळ जास्त असूनही 2022 मध्ये उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी समाधान मानलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्याची ताकदही भाजपा पक्षश्रेष्ठींना चांगली ठाऊक आहे. यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीनं तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तरी सुद्धा एकंदरीत परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
हेही वाचा :