सिंधुदुर्ग - लगेचच तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याची गरज होती असे सांगतानाच, राज्यपाल यांच्याकडे आमदार नियुक्तीसाठी गेलेली यादी ही कायद्याने गेली असती तर ती आपोआप मंजूर झाली असती, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी दिली.
राज्यपालांकडे कायद्याने यादी गेली असती तर...
राज्यपालांकडे ती यादी कायद्याने गेली असती तर मंजूर झाली असती, असे मत राज्यपाल नियुक्त आमदार यादीवर बोलताना विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे. घटनेने असं म्हटलं की ती व्यक्ती कलाकार किंवा सामाजिक कार्यकर्ते असले पाहिजेत. यात एखाददुसरा कलाकार आणि बाकी राजकीय कार्यकर्ते असतील तर राज्यपाल कायद्याच्या आधारे तपासणी करून योग्य निर्णय घेतील. त्यामुळे यात काही राजकारण नाही. तर कायद्याच्या आणि घटनेच्या आधारे यातील निर्णय होतील, असे मत यावेळी विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
विधानसभा अध्यक्षांची निवड लगेच व्हायला हवी होती
काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत काही बदल करायचे ठरवले. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देऊन ते पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लगेचच तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अध्यक्ष निवडणे गरजेचे होते. मात्र, अधिवेशन सुरू होताना विधानसभेचे अध्यक्ष नसले तरी कुठे अडचण येणार नाही. कारण अध्यक्षांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांना आहेत. मात्र, तिघांनी एकत्र येऊन लवकर अध्यक्ष ठरवला तर ते अधिक सोयीचं जाईल, असेही विनोद तावडे म्हणाले.
हेही वाचा - जळगावच्या प्रणित पाटीलला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर
हेही वाचा - टुलकिट प्रकरण : आरोपी निकिता जेकबला दिलासा, तीन आठवड्यांचा जामीन मंजूर