सिंधुदुर्ग - येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक यानंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने -
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत तर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रयत्नामुळेच चिपी विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केला. त्यानंतर सोशल मीडियावरूनही शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून चढाई सुरू झाली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने येणार आहेत.
राणेंच्या विधानाशी भाजप असहमत -
दरम्यान, राणेंच्या विधानाशी भाजप नेते असहमती दर्शविताना दिसत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही, पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झाले नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झाले असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी आले पाहिजे असे माझे मत आहे, असे शेलार म्हणाले.
प्रोटोकॉल काय सांगतो?
विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिले आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असे स्पष्ट केले. मात्र, विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावचे लागते. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचे नाव टाकावे लागते. त्यामुळे केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण दिले जाणार असल्याचे समजते. दरम्यान ऑक्टोबरमध्येच पॉलिटिकल हिट अनुभवायला मिळणार आहे. राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ठाकरे-राणे एकाच मंचावर येत असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा - भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन - अण्णा हजारे