सिंधुदुर्ग - ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात दोन ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. कुडाळ आणि सावंतवाडीत ही पथके तैनात करण्यात आली आहेत. पुणे येथून ही पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
एनडीआरएफ पथक कुडाळ कर्ली नदी किनारी तैनात
येत्या तीन दिवसात होण्याऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर कुडाळ शहरात तसेच कर्ली नदीच्या किनाऱ्यापट्टी भागात अतिवृष्टीत मदतकार्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अतिवृष्टीचा धोका कर्ली नदीच्या भागात संभवत आहे. पथक संबंधित ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे. नदी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना एनडीआरएफच्या पथकाने नागरिकांना अलर्ट राहण्याची सूचना केली. या पथकाने कर्ली नदीच्या किनाऱ्यासह कुडाळ शहरातील भंनसाळ नदीलगत असलेला परिसर तसेच माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाची पाहणी केली. त्यांच्यासोबत कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख राय उपस्थित होते.
दुसरे पथक सावंतवाडीत तैनात
सावंतवाडीतही एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यासोबत खासदार विनायक राऊत यांनी चर्चा करून मागील वर्षाच्या शिरशिंगे, असनिये, बांदा व झोळंबे भागातील खबरदारीबाबत निर्देश दिले. यापूर्वीच्या भूस्खलन व पूर स्थितीत ज्या गावांची खबरदारी घेतली होती त्या शिरशिंगे, असनिये, झोळंबे तसेच बांदा शहर अशा भागाबाबत पाहणी करून खबरदारी घेतली जाणार आहे, असे एनडीआरएफ पथकाने सांगितले. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, बांदा पूरस्थिती तर शिरशिंगे, असनिये व झोळंबेमध्ये भूस्खलन झाले होते. आपण निश्चितच खबरदारी घ्याल. प्रशासनाकडून काही सहकार्य लागले तर तेही मिळेल. याठिकाणी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे आपणास सहकार्य करतील. या पथकाच्या सर्व उपस्थित सदस्यांना खासदार राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग; जीवितहानी नाही