सिंधुदुर्ग : महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यात परमे येथील डोंगरात खोदलेल्या बोगद्याच्या तोंडावर डोंगराचा काही भाग दरडीसह पुन्हा कोसळून कालव्यात पडला. त्यामुळे येथून पेडणे गोवा येथे होणारा पाणी पुरवठा पुन्हा बंद झाला आहे. काही महिन्यांपूर्वी येथील दरड बाजूला केली होती, पण तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा डोंगर खचला आहे.
तिलारी धरणाचा उजवा कालवा हा परमे - कुडासा - पणतूर्ली ते सासोली - हणखणे - गोवा असा पेडणे गोवा तालुक्यात गेला आहे. गेल्या वर्षी या कालव्यात सासोली भटवाडी कुडासा भरपाल घोटगे परमे येथे डोंगर खचून कालव्यात आला, त्यामुळे गोवा येथे होणारा पाणी पुरवठा बंद होता. या कालव्यावर गोव्यातील मोठा भाग अवलंबून आहे. शेती, बागायतीबरोबरच येथील विविध प्रकल्पांसाठी या कालव्याचे पाणी वापरले जाते. तिलारी हा महराष्ट्र आणि गोवा राज्याची भागीदारी असलेला पाटबंधारे प्रकल्प आहे. गोवा राज्याचा मोठा भाग या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक भागात डोंगर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चेंदवण गावात अजूनही डोंगर कोसळण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर किनारी भागातही पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील आंबोली आणू भुईबावडा घाटातही दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाढती जंगलतोड आणि त्यामुळे जमिनीची होणारी धूप लक्षात घेता येथील डोंगर सतत खचण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे माहितगारांचे म्हणणे आहे.
दरम्यान तिलारी कालव्यात डोंगर कोसळून माती आल्याने सध्या गोवा राज्यातील शेती बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या कालव्यावर गोव्यातील कारखानदारी क्षेत्र अवलंबून आहे. या क्षेत्राला मिळणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यात खंड पडत असल्याने येथील कारखानदारही हवालदिल झाले आहेत. सध्या हा कोसळलेला डोंगर हलविण्याचे काम जोरात सुरू असून मातीखाली बुजलेला कालवा मोकळा करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.