सिंधुदुर्ग - ईडीने आपले कार्यालय भाजपच्या कार्यालयात हलवावे, अशी टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. यावर ईडीचा सर्वात जास्त गैरवापर हा कोंग्रेसच्या काळात झाला. ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील, पुरावे असतील त्यांची चौकशी होते. माझे तर स्पष्ट मत आहे, जर कोणी काही केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. कुठलीही एजन्सी कोणावरही थेट कारवाई करू शकत नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनारी पाहुण्या सिगल पक्षांचे थवे दाखल
फडणवीस हे सावंतवाडीत भाजप कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सदर विधान केले. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर फसवणूक केली आहे. निसर्ग चक्रीवादळात जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. हा सर्व प्रकार आपण केलेल्या राज्याच्या दौऱ्यादरम्यान उघडकीस आला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकारचे बांधकाम घोटाळे आपण उघडकीस आणले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आपण सरकारकडे केली आहे. त्यांनी कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एक रुपयाही गुंतवणूक नाही - नितेश राणे