सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आजही प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात मोठ्या अडचणी येत आहेत. यावर मालवण तालुक्यातील महात्मागांधी विद्यालय नंबर एकच्या शिक्षकांनी मुलांच्या वाडीवस्तीवर जाऊन त्यांना शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पालकही या उपक्रमाला साथ देत आहेत. तर विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुलांच्या घरी जाऊन अध्यापन -
कोरोना महामारीमुळे याठिकाणी मुलांना शाळेत शिकवणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही मुलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो. त्यांनी केलेला अभ्यास तपासून त्यांना असलेल्या शंका दूर करतो. या ठिकाणी 50 टक्के उपस्थिती ठेऊन आम्ही हे अध्यापनाचे काम करतो. या उपक्रमाला पालकांचाही चांगला हातभार लाभला आहे, अशी माहिती शिक्षक सचिन रावसाहेब घोटाळे यांनी दिली आहे.
आमची अँड्रॉइड मोबाईल घेण्याची परिस्थिती नाही -
आमची अँड्रॉइड मोबाईल घेण्याची परिस्थिती नाही. तसेच आमच्या गावात नेटही मिळत नाही. त्यामुळे काय करावे, हा प्रश्न होता. परंतु आम्ही शिक्षकांना आमच्या घरी येऊन शिकविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शिक्षक आमच्या वाडीत येतात आणि मुलांना शिकवतात. त्यामुळे मुलांचे नुकसान थांबले आहे. मुलांची त्यामुळे अभ्यासात चांगली प्रगती दिसून येत आहे. असे पालक रागिणी नारायण परब यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शिक्षकासमोर अनेक अडचणी -
शिक्षक हा राष्ट्र निर्माणातील ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या संस्कारात शिक्षक हा महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागातील शिक्षकासमोर फार मोठ्या अडचनी असतात. ऑनलाईन शिक्षण देताना अशा विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्या आहे. आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन प्रकारे शिक्षण देतो. ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत त्यांना ऑनलाईन आणि ज्यांना मिळत नाही त्यांना वाडीवर येऊन ऑफलाईन शिक्षण देतो. पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचे विनायक भानुकांत हरकुळकर यांनी सांगितले.
ऑनलाईन शिक्षणासाठी जंगलात जात होतो -
कोरोनामुळे आम्ही शाळेत जाऊ शकलो नाही. मात्र, आमचे गुरुजी आम्हाला आमच्या वस्तीवर येऊन शिकवतात. त्यामुळे आम्हाला अभ्यास करता येते. आम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी जंगलात जात होतो. कारण गावात रेंज येत नाही. नेटही मिळत नाही. तसेच जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही वाटायची. मात्र, आता आम्हाला गुरुजी येथे येऊन शिकवत असल्याने आमची अडचण दूर झाली आहे, अशी प्रतिक्रिया सहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी संचित सत्यवान परब यांने दिली आहे.
हेही वाचा - पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार अन् खासदारांना टोचणार कोरोना लस