सिंधुदुर्ग- आषाढी एकादशी निमित्त कुडाळ कुंभारवाडा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यानी दिंडी काढली. पुढे या दिंडीने हनुमान मंदिरातील हरिनाम सप्ताहात देखील सहभाग घेतला. यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व्हावी. तसेच वारीच्या परिचया सोबतच अभंग गायन, टाळांचा निनाद व तालबद्ध नृत्य, लेझिम पथक आणि वेशभूषा आदींचा प्रत्यक्ष अनुभव यावा हा यामागचा उद्देश होता. यामुळे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण अशा सर्वच विषयांना पूरक असा स्तुत्य व आनंददायी उपक्रम या निमित्ताने शाळा प्रशासनाने आयोजित केला.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यामध्ये सौजन्य शीलता, स्त्री पुरुष समानता, र्सवधर्मसमभाव ही मूल्ये तसेच भारताचा सामाजिक, सांस्कृतिक वारसा, समता, स्त्री पुरुष समानता हे गाभाघटक रुजविण्यात आल्याचे शिक्षकांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशाला मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. स्नेहा मसुरकर, उपाध्यक्ष संजय कुंभार, नगरसेवक गणेश भोगटे, सदस्य तुकाराम राऊळ, अनंत खटावकर, पालकवर्ग, ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.