रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प राबवावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली असून, याबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं आहे.
काय म्हटले आहे निवेदनात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की, राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी संपादित केली असून, ही जमीन विनावापर पडून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 175 GW सोलर एनर्जी निर्माण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5000 MW सोलर एनर्जी प्रकल्प राबविल्यास कोकण व महाराष्ट्राच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, तसेच संपादित जमिनीचाही सदुपयोग होईल. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5000 MW सोलर एनर्जी प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिने निर्णय घ्यावा, असे निवेदन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.