सिंधुदुर्ग - महाराष्ट्रातील अनेक भागात यावर्षी भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे या दुष्काळाची झळ माणसांप्रमाणेच जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. चारा आणि पाण्या अभावी जनावरांचे हाल सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यावर सरकार आणि सामाजिक स्तरातून दुष्काळ पीडितांना मदतीचा हात दिला जात आहे. त्याप्रमाणे सावंतवाडीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने देखील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवलकर यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तळवलकरांनी दुष्काळग्रस्त सातारा जिल्ह्यातील जनावरांसाठी तब्बल १० गाड्या चारा पाठविण्याचा निश्चय केला आहे. आतापर्यंत चार गाड्या भरून त्यांनी चारा पाठवला आहे.
तळवलकर यांनी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात चारा जमा केला. हा चारा ट्रकच्या माध्यमातून स्वखर्चाने ते दुष्काळग्रस्त भागात पाठवत आहेत. तसेच जास्तीत जास्त चाऱ्याच्या गाड्या पाठवता याव्यात, यासाठी त्यांनी दानशूर व्यक्तींना आवाहनही केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त चारा पाठवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे विदारक चित्र तळवलकर यांनी बातम्यांमधून पाहिले होते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना आपल्या परीने मदत करण्याच्या हेतूने ते पुढे सरसावले. तसेच स्वतःहून दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यासाठी चारा छावण्या आणि दुष्काळग्रस्त भागाची माहिती तळवलकर यांनी जमा करून ठेवली आहे.