सिंधुदुर्ग - दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर यात्रा यावर्षी साध्या पध्दतीने साजरी केली जात आहे. यावर्षी भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी केली आहे. मंदिराच्या दिशेने जाणारे मार्ग पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत.
महाशिवरात्रीच्यापासून पुढील तीन दिवस भक्तांची मांदियाळी
देवगड मधील कुणकेश्वर हे मंदिर पुरातन मंदिर आहे. पांडवानी या मंदिराला दक्षिण काशीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. अशी आख्यायिका आहे. त्या काळातील खुणा आजही या गावात आहेत. कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या पासून पुढील तीन दिवस भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे साध्या पध्दतीने व मर्यादित स्वरूपात धार्मिक विधी पार पडणार आहेत.
भाविकांना बंदी करण्यात आली आहे
यावर्षी कुणकेश्वर यात्रा मर्यादित स्वरूपाची असणार आहे. कुणकेश्वर यात्रेला भाविकांना बंदी आहे. पुजारी, देवस्थान ट्रस्ट, मानकरी यांच्या उपस्थितीत यावर्षी कुणकेश्वर यात्रा साजरी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. रात्री २ वाजता कुणकेश्वर मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर स्थानिक मांकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र या यात्रेला अन्य भागातून येणाऱ्या भाविकांना बंदी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे या यात्रेवर निर्बंध
दरवर्षी लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत ही यात्रा होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या यात्रेवर निर्बंध आले आहेत. परंतु भाविकांनी कुणकेश्वरची मनोमन आराधना करावी. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही देवदर्शनाची व्यवस्था केलेली आहे. त्या माध्यमातून भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन कुणकेश्वर देवस्थान सचिव बाळकृष्ण मुणगेकर यांनी केले आहे.
भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी कुणकेश्वर मंदिरात लाखो भाविक येत असतात. मात्र यावर्षी गर्दी मोठ्या संख्येने होण्याची शक्यता असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीमुळे वाढू नये या दृष्टीने मंदिरं भाविकांसाठी महाशिवरात्रीला बंद राहणार असल्याच प्रशासनाने जाहीर केलं. यामुळे भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात येऊ नये असे आव्हान देवस्थान आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांनी कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. तर भाविकांनी कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने येऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी केले आहे.