सिंधुदुर्ग - नारायण राणे यांची मुले त्यांच्या संस्कृती आणि व्यक्तीमत्वाचे वाभाडे काढत आहेत. सिंधुदुर्गच्या राजकारणातून राणे परिवार संपलेला आहे. त्या वैफल्यातून जिल्ह्यात अशांतता पसरवत आहेत. नीलेश राणे यांचा विनायक राऊत यांनी दोन वेळा पराभव केला आहे. त्यात आम्ही आता वैभववाडी नगरपंचायत शिवसेनेकडे खेचलेली आहे. हा फक्त ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे, अशा शब्दात शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर निशाणा साधला आहे. नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या टीकेच्या अनुषंगाने ते बोलत होते.
'मुलांमुळे नारायण राणेंना होतोय मनस्ताप'
यावेळी ते म्हणाले, की नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून मान मिळविलेला आहे. त्यांच्या या संस्कृतीचे वाभाडे काढण्याचे काम त्यांची ही दोन्ही मुले करत आहेत. वैभववाडीत आम्ही त्यांना धक्का दिला आहे. जिल्ह्यात सगळीकडेच त्यांना आता धक्के मिळणार आहेत, असेही अतुल रावराणे यांनी सांगितले.
'मुलांना आपल्या देशात शिकवले असते तर ही वेळ आली नसती'
नारायण राणे यांनी आपल्या मुलांना परदेशात शिकून काय साध्य केले. तेच त्यांना जर आपल्या देशातच शिकवले असते तर किमान त्यांना येथील संस्कृती तरी समजली असती. राणेंची राडेबाज संस्कृतीच या दोन्ही मुलांमध्ये उतरली आहे. त्यांना येथील शाळेत शिकवले असते तर नारायण राणेंना हा मानसिक त्रास झाला नसता, असेही ते म्हणाले.
'जे काही करताहेत ते वैफल्यातून'
आज राणे कुटुंबीय जे काही करताहेत ते त्यांच्या वैफल्यातून करताहेत. कारण त्यांचा आता अस्तित्व संपत आले आहे. खासदार विनायक राऊत यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार नीलेश राणेंना नाही. कारण त्यांच्या नखांची सरही नीलेश राणेंना नाही. पुढचे १० जन्म घेतले तरी खासदार विनायक राऊत यांच्या कामाची उंची गाठणे त्यांना शक्य होणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही गप्प आहोत. नाहीतर शिवसैनिक त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.