सिंधुदुर्ग- मोठ्या शहरांबरोबरच कोरोनामुळे झालेला परिणाम छोट्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवराजेश्वर मंदिरा’च्या सेवेकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आले आहे. या किल्ल्यात शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून मंदिराचे सेवेकरी असलेले सात कुटुंब राहतात. या कुटुंबांमध्ये एकूण २५ लोक आहेत. कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्याने या कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवराजेश्वर मंदिराचे सेवेकऱ्यांची हे सात कुटुंब दहा बारा पिढ्यांपासून किल्ल्यावर रहात आहेत. या किल्ल्याला दरवर्षी सुमारे साडेतीन लाख पर्यटक भेट देतात. ‘गाईड’ म्हणून या पर्यटकांकडून मिळणारे पैसे हेच या सेवेकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. लॉकडाऊनमुळे मार्चपासून किल्ल्यावर पर्यटकांचे येणे बंद झाल्याने सेवेकऱ्यांचे उत्पन्न बंद झाले.
सेवेकरी कुटुंबाची मोठी अडचण पावसाळ्यात होणार आहे. मे नंतर जून ते ऑगस्ट हे तीन महिने किल्ल्यापासूनची समुद्री वाहतूक बंद होते. किल्ल्याचा शहराशी संपर्क तुटतो. म्हणून सरकारतर्फे किल्ल्यावर मे महिन्यात तीन महिन्याचा अन्न धान्याचा साठा पुरवला जातो. पण या वर्षी मे महिना अर्धा संपत आला तरी किल्ल्यावर धान्यसाठा पुरवण्याचा आदेश आलेला नाही. त्यामुळे किल्ल्यावरील सेवेकरी कुटुंब काळजीत पडले आहेत. कोरोनामुळे मार्चपासून पर्यटन बंद झाल्याने आमचा रोजगार बंद झाला आहे ,आमची कुणी दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.