सिंधुदुर्ग - आंबोली येथील पर्यटन स्थळावरील बंदोबस्तामध्ये आणखीन वाढ करण्यात आली आहे. कडक अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखेसह स्थानिक गुन्हा आणि अन्वेषणचे पोलीस कर्मचारीही घाट परिसरात तैनात आहेत. आतापर्यंत जवळपास सहा जणांवर कारवाई करण्यात आली असून घाट परिसरातील पर्यटन स्थळावर आणखीन कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून आंबोली घाटात जवळपास सहा जणांवर नियम तोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. आंबोली धबधबा, कावळेशेत पॉईंट, महादेवगड, हिरण्यकेशी पॉईंट व इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्ताची कुमक वाढविण्यात आली आहे. पर्यटन स्थळावर कोणीही आढळल्यास त्याच्यावर साथरोग अधिनियम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येत आहे.
आज आंबोलीमध्ये पर्यटन स्थळावर मुख्य धबधबाच्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे. या पथकामध्ये दहा ते वीस कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. येथील पोलीस निरीक्षक शशिकांत खोत हे स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांच्या सोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरके आदी अधिकारी चेकपोस्ट तसेच मुख्य धबधबा आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर भेट देऊन आढावा घेत आहेत. यामध्ये दंगल नियंत्रण पोलिसांच्या पथकाच्या तुकडीसह वाहतूक शाखेचे 10 पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सात पोलीस कर्मचारी यासह येथील पोलीस ठाण्याचे दहा पोलीस कर्मचारी, अशी टीम आंबोली येथे हे सुरक्षतेसाठी तैनात करण्यात आली आहे.