सिंधुदुर्ग - अधिवेशनामध्ये संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून विरोधक आपल्याला प्रश्न विचारतील, अशी भीती वाटल्याने मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे, अशा शब्दात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना ही सुबुद्धी आधी का नाही सुचली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेच्या नेत्यांनी आज त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. आजच ही सुबुद्धी त्यांना कशी सुचली, ते कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत होते, एवढे दिवस महाराष्ट्राची जनता आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारत होते, तेव्हा सरकार का लपत होते, कोणाला वाचवले जात होते, असे अनेक प्रश्न यावेळी राम कदम यांनी उपस्थित केले आहेत.
एवढ्या दिवस मुख्यमंत्री गप्प का?
उद्या अधिवेशनाच्या वेळी भाजपचे नेते आक्रमक होतील, तिन्ही पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे जनतेसमोर निघतील. या भीतीपोटी सरकारला झुकावे लागले, आणि नाईलाजाने त्यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र तरी देखील एवढ्या दिवस शिवसेना आणि मुख्यमंत्री गप्प का होते याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल असंही यावेळी राम कदम यांनी म्हटले आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मधल्या काळात राठोड अज्ञातवासात होते. नुकतेच ते अज्ञातवासातून बाहेर पडलेत आणि त्यांनी पोहरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी राठोड यांनी शक्तीप्रदर्शन देखील केले. यावरूनही त्यांच्यावर टीका होत आहे. संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपाकडून होत आहे. तर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी देखील भाजपने लावून धरली होती. अखेर आज त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. यावर बोलताना राम कदम यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.