सिंधुदुर्ग - विलगीकरणात असलेल्या एका तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. हा तरुण मुंबईतील मालाडहून कालच (26 मे) आपल्या गावात आला होता. त्याला शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
संबंधित तरुण आपल्या पत्नी आणि मुलीसह मालाडहून खासगी गाडीने मंगळवारी गुळदुवे गावात आला. गावात आल्यानंतर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. परंतु, रात्री अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला उपचारांसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या तरुणाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्र आज खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची तपासणी होणार नाही, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 असून त्यापैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दहा जणांवर उपचार सुरू आहेत.