सिंधुदुर्ग - जिल्ह्यात येत्या गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६८ हजार घरगुती आणि ३२ सार्वजनिक गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात २० अधिकारी, १३८ कर्मचारी, २५० होमगार्ड, तसंच दंगल नियंत्रण पथक यांच्या द्वारे बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. गणेशोत्सवासाठी बाहेर गावाहुन आलेल्या लोकांनी विलगीकरण करून घ्यावे, गणपती विसर्जनासाठी गर्दी करू नये, शक्य झाल्यास घरीच कृत्रीम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील अत्यंत महत्वाचा सण आहे. या सणासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी आपापल्या गावी दाखल होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसात ४० हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे संकट वाढले आणि दीड लाख चाकरमानी याठिकाणी आधीच दाखल झाले होते. गणेश चतुर्थीला ज्या चाकरमान्यांना गावी जायचे आहे, त्यांच्यासाठी १४ दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे असल्याने मुळातच चाकरमानी कमी आले आहेत,. शेवटच्या क्षणी रेल्वेने खास गाड्याही सोडल्या मात्र त्यालाही कोरोना चाचणी सर्टिफिकेट सक्तीचे असल्याने हातच्या बोटावर मोजण्याइतके चाकरमानी कोकणात दाखल झाले.
यापूर्वी परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना लागण होत होती; पण गेल्या महिन्या दोन महिन्यांमध्ये स्थानिक नागरिक आजाराने संसर्गजन्य होऊ लागले आहेत. प्रशासनाने अनेक नियम आणि अटी लागू केल्या; पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू झाले. मुळात ग्राहकांच्या हातातच पैसा नसल्यामुळे स्थानिक बाजारपेठांवर आर्थिक उलाढालीचा परिणाम दिसून आला आहे. श्रावणात अतिवृष्टीमुळे नागरिक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळेही आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला.
गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असले तरी ग्राहक बाजारपेठेत तसा पोहचू शकलेला नाही. किंबहुना मुंबईहून येणारे चाकरमानी टप्प्याटप्प्याने गावाकडे आल्यामुळे एकाच वेळी होणारी खरेदी तशी थांबलेली आहे. बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही. दरवर्षी गणेशोत्सवाच्यापूर्वी चार दिवस मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येत असतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल जिल्ह्यामध्ये होते. यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून सार्वजनिक कार्यक्रम जवळपास बंद झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरात-वाडीत, वस्तीवर होणाऱ्या सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम होणार नसल्याने खरेदीही होणार नाही. तसेच मोठा सार्वजनिक कार्यक्रमही नियोजित नसल्याने प्रवासाचे योगही येणार नाहीत. परिणामी जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीबरोबरच खाजगी भाडे तत्वावर चालणाऱ्या प्रवासी वाहनातील तीन आसनी, सहा आसनी रिक्षा किंवा वडाप वाहतूक यांच्याही व्यवसायावर तीव्र परिणाम होणार आहे.