सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील नागरिकांना भेडसावणारा वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आहे. विजयदुर्ग–कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करण्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अधिसूचना काढली आहे. त्यामुळे रखडलेल्या रेल्वे भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
कोकिसरे उड्डाण पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वैभववाडीवासीयांनी अनेक आंदोलने व मोर्चे काढले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादन करण्याची अधिसूचना १८ जून रोजी काढली आहे.
पाच गावांतील महामार्गाच्या जमिनीचे होणार भूसंपादन
तळेरे – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ जी या मार्गावरील कोकिसरे रेल्वे भुयारी मार्गासाठी नाधवडे, बांधवाडी, नारकरवाडी, कोकिसरे व वाभवे अशा पाच गावांतील सुमारे १० किमी मार्गालगतची भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी कणकवली यांना देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोकिसरे, नारकरवाडी व बांधवाडीनजीकची जमीन भुयारीसाठी आवश्यक आहे.
यापूर्वीच प्रकल्पाला 64 कोटी मंजूर
कामासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने भुयारी मार्ग प्रकल्पाला 64 कोटी मंजूर केले आहेत. येथील रहिवाशांना कोल्हापूर गाठण्यासाठी हा अत्यंत सोयीचा मार्ग आहे. बऱ्याचवेळा फाटक पडलेले असल्यामुळे रुग्णवाहिका अडकून पडल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. भुयारी प्रकल्प झाल्यास गेली अनेक वर्ष कोकिसरे रेल्वे फाटक येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.