सिंधुदुर्ग - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात महाजनादेश यात्रेद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कणकवलीत आली होती. त्यावेळी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंनी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. तसेच मी लवकरच भाजपवासी होणार आहे, असे नारायण राणेंनी यावेळी म्हणाले.
हेही वाचा - विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क होणार? आरवलीच्या वेतोबाचा कौल
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलिन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. राणेंसोबतच त्यांचे दोन्ही चिंरजीव निलेश आणि नितीश राणेही भाजपात जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राणे पिता-पुत्रांकडून सिंधुदुर्गात महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - वेंगुर्ला नवाबाग येथे पारंपारिक रापणीला बंपर मासळी
यावेळी बोलताना राणे म्हणाले, माझा भाजपमधील प्रवेश हा मुंबईत व्हावा, अशी इच्छा मी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात माझा भाजपमध्ये प्रवेश होईल. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात जाण्याचा काही प्रश्न नाही. शिवसेना-भाजप युतीमध्ये काहीही झाले. तरी माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश निश्चित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.