सिंधुदुर्ग - 'माझी चूक नाही, मला बदनाम करण्यात येत आहे. मी कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जायला तयार आहे.' असे खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांनी म्हटले आहे. काल (शनिवार) कणकवलीत हितेश यांचा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर विचारणा करण्यात आली असता, गीतेश राऊत यांनी आपण कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले.
माझी कोणतीही चूक नसताना मला बदनाम करण्याचे कारस्थान होत आहे. गाडी पार्किंग करत असताना सुरूववातील पोलीस उद्धटपणे बोलले. नंतर शिवीगाळ करायला सुरूवात केली. मी फक्त प्रतिकार केला. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रसंगी काही विरोधकांनी राजकारण करत सदर प्रकरणाला विचित्र वळण देण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांची स्वतः दारू पिऊन धिगांना घालायची संस्कृती आहे. त्यांना दुसऱ्या लोकांबद्दल पण तसेच वाटणार. पुढील काळात कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. माझे उत्तम सहकार्य पोलिसांना लाभेल असे, गीतेश राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा - ही तर सत्तेची गुर्मी... मनसेचा आंदोलनाचा इशारा
नेमके प्रकरण काय ?
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने काल (शनिवार) कणकवली शहरातील मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हारल झाला. तुझी आता बदली करतो, तू मला ओळखत नाहीस, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय? तुझी हिम्मतच कशी झाली. तुला माझा इंगा दाखवतोच, अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून ते पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करत असल्याची सर्व घटना व्हिडिओत रेकॉर्ड झाली होती.