सिंधुदुर्ग - खासदार नारायण राणे आज कणकवली येथील ओम गणेश निवसस्थानाहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. गोवा येथून विमानाने ते दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान कार्यकर्त्यांनी 'दादा शुभेच्छा' असं म्हणताच सर्वांना नमस्कार करत 'आभारी आहे' असे म्हणालेत. तर दिल्लीतून आपल्याला अद्याप फोन आला नाही, आल्यावर सांगतो असेही त्यांनी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी राणे दिल्लीला गेल्याचे सांगितले. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली तर कोकसाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचे म्हटले आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा 100 टक्के सहभाग असेल असा आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग मधून नारायण राणे दिल्लीला रवाना..
भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशा बातम्या येत असतानाच आज राणे कणकवलीहुन दिल्लीला रवाना झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार - राजन तेली
7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राणेंचा मंत्रिमंडळ विस्थारात नक्कीच सहभाग असेल असा आम्हाला विश्वास आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
राणेंचे सूचक विधान..
दरम्यान सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं. तर आज कणकवली येथील निवस्थानातून निघताना राणे यांनी अजून आपल्याला फोन आला नसल्याचे म्हटले आहे. तर आपण दिल्लीला निघालो असून आपला सर्वांचा आभारी असल्याचेही त्यांनी सांगितले.