सिंधुदुर्ग : राज्य सरकारवर भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार सर्वच मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीत कोणातही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत हे सरकार कोसळेल, असे भाकीत खासदार नारायण राणे यांनी आज(सोमवरा) मालवण येथे केले आहे.
खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर सुशांतसिंह प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीत ना एकमत आहे, ताळमेळ आहे. त्यामुळे सरकार चालणार कसे? असे ते म्हणाले आहेत. हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या हत्येचा मुद्दा मागे पडावा यासाठीच कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याची भाषा शिवसेना करत आहे. मात्र, अशा आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान देण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी आमच्यासोबत यावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. हे सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. तसेच ठाकरे सरकार हे पिंजऱ्यातील सरकार आहे. मातोश्री हा एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत. अशीही टीका राणे यांनी यावेळी केली.