सिंधुदुर्ग - सरकार वाचवून आपले दुकान चालू ठेवण्यासाठी आज भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले, असा घणाघाती आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. तर शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो ? असे नारायण राणे सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - सिंधुदुर्ग : वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडकेल्या बिबट्याला जीवदान
अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षांचेच
राज्यातले अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षाचेच आहे. महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी पत्रकार परीषद मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते, मात्र ते पळून गेले. त्यांना कोणतेही गाभीर्य नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असाही आरोप नारायण राणे यांनी केला.
स्वप्नील लोनकरच्या मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार
स्वप्नील लोनकरने आत्महत्या केली. त्याला नोकरी मिळाली असती तर तो आज जिवंत असता. त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप करत राणे म्हणाले की, हे सरकार फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याचे काम करत आहे. अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे. अनिल परब, अनिल देशमुख अशा मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप होत आहेत.
असा मुख्यमंत्री शरद पवार यांना चालतो?
लोकसभेचे अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत होऊ शकते. मात्र, महाराष्ट्राचे अधिवेशन फक्त दोन दिवसाचेच कसे ? असा प्रश्न करताना राणे म्हणाले, एक लाख तीस हजार लोक मृत्यूमुखी पडले. कोरोनामुळे मात्र त्याची चर्चा नाही, गांभीर्य नाही, मुख्यमंत्री गंभीर नाहीत. आपातग्रस्त शेतकऱ्यांचे अजून पैसे दिले नाहीत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, जो कॅबिनेटला जात नाही, ना अधिवेशन घेत आणि असा मुख्यमंत्री शरद पवार यांना चालतो?
आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात
स्वप्नील लोनकरच्या मृत्यूनंतर आता आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट सरकार बघत आहे? असा सवाल करतानाच सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचे निलंबन झाले आहे. मात्र, यांनी जरी बाराचे निलंबन केल, तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असेही राणे म्हणाले.
आदित्य सांगेल त्याच फाईलवर मुख्यमंत्री सही करतात
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही, म्हणून अधिवेशनात ठराव करतात, मग मोदींशी पंन्नास मिनिटे चर्चा कसली करत होता, आपल्या घरातील, पक्षातील कोणावर कारवाई करू नका म्हणून का ? हे सरकार फक्त आदित्यसाठी चालत आहे का? आदित्य सांगेल त्याच फाईलवर मुख्यमंत्री सही करतात, असा गंभीर आरोपही राणे यांनी केला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाची चर्चा आहे यावर बोलताना राणे म्हणाले की, मी आभार मानतो आणि असे काही घडो म्हणून तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्र येत नाही आणि मी जो पर्यंत शपथ घेत नाही, तो पर्यंत जरा धीर धरा, असे राणे हसून म्हणाले.
भास्कर जाधव कुठे आहे? कुठल्या पक्षात आहे?
राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार आरोप केला. भास्कर जाधव कुठे आहे? कुठल्या पक्षात आहे? शोधाव लागते. देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत, उद्या मुख्यमंत्री होतील, भास्कर जाधव कोण आहे? तर अजित पवार यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर असून साखर कारखाने डबघाईला आणून तेच कारखाने कमी किंमतीत विकत घेतले म्हणून ही कारवाई आहे, असेही राणे म्हणाले.
भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबित
इम्पेरिकल डेटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्यात धक्काबुक्की झाली. याप्रकरणी 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असून या बाबातचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. निलंबित आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे.
हेही वाचा - बघा, तब्बल २०० फूटांहून कोसळणारा नयनरम्य मांगेली धबधबा; कर्नाटक, गोवा आणि राज्यातील पर्यटकांची पसंती