सिंधुदुर्ग - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते नारायण राणे वारंवार हे सरकार पडणार, असे सांगत आहेत. त्यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असे वक्तव्य केले. 2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. या शिवाय हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचे बहुमताचे भक्कम सरकार स्थापन होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
केंद्रातही आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार, असा दावा राणेंनी केला आहे. त्याचबरोबर, चिपी विमानतळ आपणच सुरू करणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी चिपी विमानतळ पाहाणी दौऱ्यानंतर दिली.
नितेश राणेंच्या 'त्या' मागणीचे मी पूर्ण समर्थन करणार नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदपर्श झाला आहे. त्यामुळे, चिपी विमानतळाला त्याला साजेसे असेच नाव द्यावे, असे आमदार नितेश राणेंच्या मागणीचे मी पूर्ण समर्थन करणार नाही. नावाच्या वादापेक्षा त्या ठिकाणी येणार्या पर्यटकांना चांगली आणि दर्जेदार सेवा मिळावी. तसेच, सर्व विमाने या ठिकाणी थांबावीत, अशी भूमिका नारायण राणे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - सिंधुदुर्गात दगड खाणीमध्ये उत्खनन करताना सुरूंग स्फोटामुळे निगूडे गावातील 157 घरांना तडे
चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी चर्चा होत असली, तरी अनेक कामे बाकी आहेत. आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. स्थानिक ग्रामस्थांचे समाधान केल्याशिवाय विमानतळ सुरू होणार नाही. रस्त्यांसह, मोबाईल रेंज, विजेची सेवा, अशा अनेक समस्या आजही चिपीत आहेत. त्यामुळे, त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. तसेच, ज्या परवानग्या केद्रांकडून घ्यायच्या राहिल्या, त्या घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे राणे यांनी सांगितले.
पालकमंत्री आणि खासदारांचे ऐकू नका
जिल्ह्यातील पालकमंत्री आणि खासदारांचे काही ऐकू नका, हे टेंपररी आहेत. लवकरच ते लाँग रजेवर जाणार आहेत. मार्च नंतर केंद्रात आणि राज्यात आमचेच सरकार येणार आहे, असा टोला देखील राणे यांनी नाव न घेता पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांना लगावला.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनारी पाहुण्या सिगल पक्षांचे थवे दाखल