सिंधुदुर्ग - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. अजून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते जिल्हा आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात आली आहे. भातशेती ही चांगली झाली होती. मात्र, जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसाने काही ठिकाणी भातशेती आडवी पडली असून त्या भाताला कोंब आले आहेत. तसेच कापलेले भात भिजून कुजून गेले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आपण जिल्हा प्रशासनाला या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे करीत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी याचा विचार करावा. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पंचनामे करावेत. सध्याच्या आकडेवारीनुसार प्राथमिक नुकसान १० हजार हेक्टरचे झाल्याचे दिसते.
प्राथमिक नुकसान जरी इतके असले तरी त्यामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तरी त्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे ही आमची भूमिका आहे. ज्याठिकाणी पंचनाम्यांविषयी लोकांच्या तक्रारी असतील तेथे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ज्यांना अद्याप प्राप्त झालेली नाही, त्यांना येत्या दोन दिवसात सर्व रक्कम देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
यंदाच्या वर्षी भात खरेदीसाठी २५ केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान ५० हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी नामदेव गवळी यांनी यावेळी दिली. भात खरेदी ही १ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. तसेच यावर बोनसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावी अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. तसेच बोनसचा प्रस्ताव व खरेदी मंजुरीसाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवून तो मंजूर करून घ्यावा. मदत लागल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.