सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाट्टेल तितकी ताकद पुरवावी. राणेंना पुन्हा एकदा धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही. याअगोदर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी महसूल मंत्री, उद्योग मंत्री अशी मोठमोठी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा खटाटोप केला होता. त्यावेळी नारायण राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला, असे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
नारायण राणेंची नेमकी प्रतिमा काय-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख 'महाराष्ट्राचे दबंग नेते' असा केला. मग या दबंग नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देताना 'तारीख पे तारीख' देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा फडणवीसांनी द्यायला हवे होते. या कार्यक्रमात अमित शहा नारायण राणेंच्या वेगवेगळ्या प्रतिमांविषयी बोलत होते. नारायण राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षापुर्वी विधानपरिषदेच्या सभागृहात नारायण राणेंवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी आवर्जुन पाहावा. त्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी नारायण राणेंनी केलेल्या गुन्ह्यांची कुंडली मांडून भर विधानपरिषदेत त्यांच्या अब्रूची लख्तरे अक्षरशः वेशीवर टांगली होती. जेणेकरून नारायण राणेंनी भुतकाळात काय काय दिवे लावलेत आणि त्यांची प्रतिमा किती उजळलेली आहे, हे शहांच्या लक्षात येईल. असेही ते म्हणाले.
सत्ता हस्तगत करायची, ही भाजपची कार्यपद्धती-
निवडणुकांमध्ये जनतेने नाकारले असेल तर 'ऑपरेशन लोटस'च्या गोंडस नावाखाली अमर्याद पैशांचा वापर करून आमदारांची फोडाफोडी करायची आणि सत्ता हस्तगत करायची, ही भाजपची कार्यपद्धती आहे. देशाच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द उदयास येण्यासाठी सर्वस्वी भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे. महाराष्ट्रात देखील पहाटे-पहाटे सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे नापाक मनसुबे अयशस्वी झाले. त्यामुळे कोल्ह्याना आता द्राक्षे आंबट लागत असून एकाएकी लोकशाहीतील जनादेशाची आठवण झाली आहे. अशी टीकाही त्यांनी केली.
एनडीएमध्ये तीन-चार पक्ष सुद्धा शिल्लक राहिले नाहीत-
अटल बिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएमध्ये तीस पेक्षा जास्त पक्ष समाविष्ट होते. आज नरेंद्र मोदींच्या काळात एनडीएमध्ये तीन-चार पक्ष सुद्धा शिल्लक उरलेले नाहीत. भाजपची शीर्षस्थ नेतेमंडळी ही खोटारडी व विश्वासघातकी असल्यामुळे एनडीएमधून एक-एक प्रादेशिक पक्ष कमी झाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने देशातील जनतेला दिले होते. या आश्वासनाला विसरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले. सत्तेत येताच भाजपला या आश्वासनाचा विसर पडला, असे आमदार नाईक म्हणाले.
शासकीय मेडिकल कॉलेज होणारच-
सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज हे 20 वर्षापूर्वी मंजूर झालेले आहे. मात्र राणेंनी स्वतःचे कॉलेज काढण्याच्या नादात या कॉलेजचा पाठपुरावा केला नाही. त्यांच्या मेडिकल कॉलेजला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कॉलेजला विरोध केला, असा खोटा कांगावा ते करत आहेत. आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मंजूर झालेले शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा- भारतरत्नांची चौकशी घरी जाऊन नाही, केवळ ट्विटची माहिती घेणार - छगन भुजबळ