सिंधुदुर्ग - विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी हसतमुखाने केले. यावेळी उपस्थितांच्या मात्र चांगल्याच भुवया उंचावल्या. यानंतर विमानतळाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला.
मुख्यमंत्र्यांचे हसतमुखाने केले स्वागत
भाजप आमदार नितेश राणे हे कायम राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करतात. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडत नाहीत. मात्र, शनिवारी (दि. 9 ऑक्टोबर) चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार नितेश राणे यांनी गुलाबपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वैरी असले तरी मुख्यमंत्र्यांचे हसतमुखाने स्वागत करण्याची परंपरा आमदार नितेश राणेंनी जपल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.
हेही वाचा - चिपी विमानतळाचे उद्घाटन; नाव न घेता मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक
सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली
या स्वागत सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन संपन्न झाले. सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. चिपी विमानतळाचे लोकार्पण झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं'; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी