सिंधुदुर्ग - महाराष्ट्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, हे सरकार बेईमान आहे, यामुळे आजचा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा.
सरकार बरखास्त करुन निवडणुकीला सामोरे जा
28 नोव्हेंबर हा दिवस खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी, शेतकरी, कामगार सगळ्यांशी बेईमानी केली. बेईमानी करून या ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकार बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा. जनतेच्या मनात काय आहे हे मतदानाच्या माध्यमातून जनताच दाखवले, असेही ते म्हणाले.
दोन वर्षांत सरकारने कोणतेही विधायक काम केले नाही
सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. मात्र या दोन वर्षात कोणतीही विधायक काम राज्यात झाले दिसत नाहीत. किंबहुना सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे सरकार काही सांगत नाही. खरंतर शिवसेना-भाजप युतीला जनतेने कौल दिला होता. मात्र, जनमताच्या विरोधात जाऊन हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे जनतेसोबत केलेली ही बेइमानी आहे, असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले. दोन वर्षात कोणते काम केले हे सरकारने आज सांगण्याची गरज होती. मात्र, याबाबत कोणती माहिती सरकार देऊ शकत नाही यावरूनच सरकारने काय केले हे समजते असे ते म्हणाले.
हे ही वाचा - सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून नारायण राणे अन् विनायक राऊत यांच्यात कलगीतुरा