कणकवली - गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांचा भाजप प्रवेश प्रतिक्षेत होता. अखेर राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपवासी झाला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली येथील सभेत केली.
हेही वाचा - '14 हजार शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडाल?'
भाजपने खासदार नारायण राणे यांना अनेक दिवसांपासून वेटिंगवर ठेवले होते. अनेक मुहूर्त टळल्यानंतर अखेर राणे भाजपवासी झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपमध्ये विलीन झाला आहे. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत आले होते. यावेळी प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खासदार निलेश राणे आणि इतर स्वाभिमानी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला. तसेच स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. तसेच घटकपक्ष म्हणून आपला पक्ष एनडीएत देखील समाविष्ट केला होता. त्यानंतर राणेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. मात्र, राणे भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून देखील शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश बराच काळ ताटकळला होता. दरम्यान राणेंचा प्रवेश होल्ड वर ठेऊन त्यांचे पुत्र नितेश राणे यांना घाईघाईत भाजप प्रवेश देण्यात आला. तसेच त्यांना कणकवलीतून उमेदवारीही देण्यात आली. त्यानंतरही नारायण राणेंचा प्रवेश आणि स्वाभिमन पक्षाचे विलिनीकरण प्रतिक्षेत होते. मात्र, आता नारायण राणे खऱ्या अर्थाने भाजपवासी झाले आहेत.
हेही वाचा - भाजपच्याच शेतकरी कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - राहुल गांधी