सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ला वायंगणी कामतवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या बोगस कामाची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली होती. या विहिरीची पाहणी करायला शासनाचे अधिकारी आले. यावेळी विहिरीच्या कामावरून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यातून बाचाबाची झाली. गावचे सरपंच सुमन कामत यांना आपण मास्क का लावला नाही, असे कुणीतरी विचारले. यावेळी, 'मास्क लावत नाही, काय करायचे ते करून घ्या, अशी भाषा सरपंचांनी वापरली. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे सरपंचांची तक्रार केली आहे.
वायंगणी कामतवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या कामाची पाहणी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आले होते. त्यांच्यासमवेत वायंगणी सरपंच सुमन कामत व उपसरपंचही आले होते. मात्र, सरपंच व उपसरपंचांच्या तोंडाला मास्क नसल्याने ग्रामस्थांनी विचारणा केली असता, येथील सरपंचांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. 'आम्ही कोणीही मास्क घालणार नाही. काय करायचे ते करून घ्या', अशी उर्मट भाषा सरपंचांनी वापरली, असे ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सध्या कोरोनाच्या काळात सरपंचांवर मोठी जबाबदारी आहे. ग्राम सनियंत्रण समितीचे सरपंच हे अध्यक्ष आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या आजारात गावची जबाबदारी असणाऱ्या गावचे प्रथम नागरिक असणाऱ्या सरपंचांनीच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरल्यामुळे सरपंच, उपसरपंचांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वेंगुर्ला तहसीलदार यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे.
'आमच्या शासकीय विहिरीचे काम अर्धवट झाले आहे. हे काम पाहण्यासाठी शासकीय अधिकारी आले होते. यावेळी या अधिकाऱ्यांना आम्ही कामाबाबत विचारले असता त्यांच्या अर्धवट कामाबाबत लक्षात आले. काही कारण सांगून ते काढता पाय घ्यायला लागले तेव्हा सरपंचांना ग्रामस्थांनी मास्क बद्दल विचारले असता त्यांनी उद्धटपणे उत्तर दिले. सरपंचांसारख्या व्यक्तीकडून अशी वागणूक अपेक्षित नाही, असे ग्रामस्थ लाडू कामात यावेळी म्हणाले.