सिंधुदुर्ग - कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात समर्थनगर येथे शनिवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याच्या मृतदेहावर बंदुकीच्या गोळीची जखम आहे. त्यामुळे बिबट्याची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
स्थानिक रहिवासी रमेश टेमकर यांना पायवाटेवरून जाताना हा मृत बिबट्या दृष्टीस पडला. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्याला गोळी घालून ठार मारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बिबट्या मादी जातीचा असून दोन वर्षे वयाचा असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरील बिबट्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्ती जवळ आला असावा आणि त्याच दरम्यान गोळी घालून अज्ञाताने त्याची शिकार केली असावी, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र, राजेरोसपणे संरक्षित प्राण्यांची शिकार होत असताना वनविभाग काय करीत आहे? असा प्रश्न प्राणी मित्रांकडून विचारला जात आहे.