सिंधुदुर्ग - कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांनी पुढाकार घेतला आहे. दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे, कलमे निमिर्ती हा प्रकल्प येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात विद्यापीठ आणि लुपिन फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक स्तर उचवण्याच्या दृष्टीने या प्रामाणिक प्रयत्न असल्याची माहिती वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत व लुपिन फाउंडेशनचे व्यवस्थापक योगेश प्रभू यांनी दिली.
दुर्लक्षित औषधी वनस्पतींमध्ये सुरंगी, वडसोल, वावडिंग, त्रिफळ, कडीकोकम यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. कोकणामध्ये नैसर्गिक अधिवासात आजही तग धरून असणाऱ्या व व्यापारीदृष्ट्या महत्व असूनही दुर्लक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करण्यात येणार आहे. या वनस्पतींचे क्षेत्र वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने व कोकणातील समृद्ध जैव विविधतेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने या वनौषधींचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे डॉ. बी. एन. सावंत यांनी सांगितले. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. कोकणातील दुर्लक्षित वनस्पतींचे सर्वेक्षण, संग्रह, जतन व विविध अभिवृद्धी पद्धती विकसित करणे व त्याचबरोबर या दुर्लक्षित औषधी वनस्पतींच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करणे, या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. असे यावेळी सांगण्यात आले.