सिंधुदुर्ग - पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटमार्गांपैकी महत्पूर्ण असलेला करूळ घाटमार्ग आज सोमवारी सायंकाळपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे मार्ग खचल्याने गेले चार दिवस या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. खचलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप व बॅरेलमध्ये दगड माती टाकून मार्गाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 15 ऑक्टोबरला अतिवृष्टीमुळे रात्री करूळ घाट मार्ग एका बाजूने खचला होता. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला होता. त्यामुळे गेले चार दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली होती. दररोज रात्रीच्यावेळी घाटमार्गातून मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय यंत्रणेने 15 ऑक्टोबरपासून घाटमार्ग बंद केला होता. त्यानंतर या घाटमार्गाची तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हिवाळे यांनी पाहणी केली होती. त्यानंतर गेले चार दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने युद्ध पातळीवर काम सुरू केले होते.
पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडणारा महत्वपूर्ण असा करूळ घाट मार्ग आहे. गेल्या चार दिवसांपासून करूळ घाटमार्गातून जाणारी वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडीच्या वतीने युद्धपातळीवर खचलेल्या घाट मार्गावर बॅरेल मध्ये दगड व सिमेंटचे पाईप टाकून घाटमार्ग वाहतुकीस तात्पुरता सुरु करण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हिवाळे यांनी रस्ता वाहतुकीस तात्पुरता सुरू करण्यात आला असल्याचे पत्र वैभववाडी पोलीस स्टेशन व वैभववाडी तहसीलदार यांना दिले आहे.