सिंधुदुर्ग - शहरातील बाजारपेठ आणि परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षा म्हणून हा परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी केली आहे. तसेच शहरातील साईनगरमधील 300 मीटर परिसरही कंटेनमेंट झोनमध्ये आहे.
कणकवली शहरातील आताच्या कंटेनमेंट झोनमध्ये 1 हजार 376 कुटुंबे राहतात. बाजारपेठ व साईनगरचा काही भाग 10 जुलैपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सील असेल. याबाबत प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांनी आदेश जारी केला आहे. कणकवली बाजारपेठेसह शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कंटेनमेंट झोन घोषीत केले आहेत.
साईनगरातील साईपूजा अपार्टमेंट ते साईशब्द अपार्टमेंट अशा 300 मीटर परिसरातील 65 घरांचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री ही 10 जुलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.