सिंधुदुर्ग - जिल्ह्यात यंदा कलिंगडाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षीही भाव मिळत नाही असे चित्र आहे. त्यात लॉकडाउनमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बदलते हवामान आणि अस्थिर बाजारभावामुळे कलिंगडासारख्या ९० दिवसांत पैसे मिळवून देणाऱ्या पिकाकडूनही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. सध्या जिल्ह्यात हजारो टन माल शेतातच पडून आहे.
कसालमधील नीलेश गावडे या युवकाने गडमट या परिसरामध्ये सात एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे. गेल्यावर्षीसुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वच मार्केट बंद असल्याने विक्रीला मोठा ब्रेक लागला. त्यामध्ये ७ लाखाच नुकसान झालाय, एवढं मोठं नुकसान भरून कस काढायचं हा प्रश्न समोर उभा राहिला आहे. अक्षरश: चार ते पाच एकरमधील कलिंगड जमीनदोस्त झाले आहेत.
सात एकरमध्ये कलिंगड लावले होते
निलेश गावडे दरवर्षी ७ ते ८ एकर मध्ये कलिंगड या पिकाची लागवड घेत असून, गेल्यावर्षी देखील त्याच प्रमाणे ७-८ एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड केली. गेल्या वर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परिणामी गतवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल या हेतूने कलिंगडाचे पीक घेतले. मात्र, यावर्षी देखील कोरोना महामारीने अक्षरश: त्यावर पाणी सोडले.
गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी विकले जातात कलिंगड
दरवर्षी प्रत्येकी एक एकर कलिंगडसाठी १ लाख रुपये खर्च येतो. मल्चिंग पेपर, ठिबक, पाइपलाइन, खते यासह यामध्ये लागणारी मजुरी हा सर्व खर्च मोठ्या प्रमाणाते होतो. परिणामी सात ते आठ एकरामध्ये सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आता ही खतं आणि किटकनाशकं विकत घ्यायची तर शेतकऱ्यांकडे सगळी रक्कम रोखीत पाहिजे. कलिंगडासाठी ह्या गोष्टी कुणीच उधारीवर देत नाहीत. गतवर्षी देखील नफा होईल अशी नीलेश यांना आशा असल्याने त्यांनी मार्च ते जूनच्या काळात तीन टप्प्यात फळ हाती येईल अशा पद्धतीने सात ते आठ एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली. साधारणपणे एका एकरात १५ टन कलिंगड होतं. यातली १० टन तरी एकदम सुबक, नितळ, वजन आणि आकारात सारखी आणि कसलेही ओरखडे नसणारी कलिंगड असतात. हे सर्व कलिंगडाचे उत्पादन सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी विक्री होते असे नीलेश यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे बाजारभावात मोठी घट
लॉकडाऊनच्या आधी ८ ते ९ रुपये प्रति किलो कलिंगड भाव मिळत असे. लॉकडाऊनमध्ये तर १ ते २ रुपये भाव मिळत आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही मिळत नाही. शेतीसाठी केलेला खर्च प्राप्त व्हावा या कारणाने १ ते २ रुपये किलोने व्यापाऱ्यांना कलिंगड द्यावे लागत आहे. कोरोनाचे संकट आलं नव्हतं तेव्हाही लागवडीचा वाढता खर्च, भावातला चढउतार यामुळे कलिंगडाची शेती बेभरवशाचीच होती आणि आता सगळंच ठप्प झाल्यानंतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी यंदाचा हंगामही मुद्दलसुध्दा पदरात पडणार नाही असा ठरला आहे.
हेही वाचा - विरोधी पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे - विजय वडेट्टीवार