सिंधुदुर्ग - झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा उपक्रम जिल्ह्यातील गावागावामध्ये पोहोचविण्यासाठी ब्रि. सुधीर सावंत यांनी कृषी प्रतिष्ठानद्वारे शासनाला प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाला चार दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. नववी राज्य स्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद , महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे नववी राज्य स्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या परिषदेला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. केसरकर यांनी कृषी प्रतिष्ठानची नैसर्गिक शेतीची नोडल संस्था म्हणून घोषणा केली. यावेळी पालकमंत्रांच्या हस्ते नैसर्गिक शेतीच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
आम्ही विष मुक्त अन्न समाजाला देण्यासाठी नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबवित आहोत. या विषयाचे चार महिन्याचे प्रशिक्षण आठ नोव्हेंबरपासून ओरोस येथे सुरू करणार असल्याची माहिती ब्रि. सुधीर सावंत यांनी परिषदेमध्ये दिली.
यावेळी शिक्षक रत्न, आरोग्य रत्न, सेवा रत्न ,नारी रत्न अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. दीनानाथ वेरणेकर, प्रदीप सावंत, अशोक सारंग, सुलेखा राणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रदेश महिला प्रमुख रजनी नागवंशी, पोलीस उपनिरीक्षक मिथूनकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.