सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे येथे शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका शिकाऱ्याच्या बंदुकीने पेट घेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारीवडे-गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) या शिकारी युवकाचा अंत झाला. ही घटना कारीवडे येथील जंगल परिसरात घडली.
अभिजीत हा शिकार करण्यासाठी रात्री जंगलात गेला असता, अचानक बंदुकीने पेट घेतला. त्यात त्याचा उजवा हात जायबंदी झाल्याने तो रक्तबंबाळ स्थितीत घरी आला. त्यामुळे रातोरात त्याला सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सध्या पावसाळा सुरू झाला असून, येथील जंगलात शिकारीचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात गोळी लागून अनेक शिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.