सिंधुदुर्ग - गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सध्या जिल्ह्यात येत आहेत. प्रवेश करण्यापूर्वी खारेपाटण येथील राजापूर चेक पोस्टवर त्यांची नोंदणी, ई-पास तपासणी, आरोग्य तपासणी, हातावर शिक्के मारणे आवश्यकता असल्यास कोविड रॅपिड टेस्ट करूनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गौरी-गणपती हा कोकणातील महत्वाचा सण आहे. गणेशोत्सव जवळ येताच चाकरमान्यांची पावले आपोआपच गावाकडे धाव घेत असतात. गणेशोत्सव आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्चित झाली आहे. तसे ठराव देखील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. मात्र, यावर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवासाठी १४ दिवसांचा क्वारंटाइन होण्याचा कालावधी असल्याने मुंबई, ठाणे, पुण्यातील तसेच इतर राज्यातील चाकरमानी आतापासून गावी जाण्यास निघाले आहेत. खासगी आराम बस तसेच इतर वाहनातून ते आपापल्या गावी दाखल होत आहेत.
आजपासून मोठ्या संख्येने चाकरमानी येत असल्याने खारेपाटण चेकपोस्टवरील महसूल, आरोग्य आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गावी येणार्या प्रत्येक चाकरमान्यांची नोंदणी, ई-पास तपासणी, आरोग्य तपासणी, हातावर शिक्के मारणे आवश्यकता असल्यास कोविड रॅपिड टेस्ट केल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे खारेपाटण येथील राजापूर चेकपोस्टवर नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत. मात्र, चेकनाक्यावरील तपासणी केंद्रांवर अपुरी बैठक आणि मंडप व्यवस्था असल्याने चाकरमानी आणि तेथील कर्मचार्यांत वादही निर्माण झाले होते. त्यामुळे चाकरमान्यांचा ओघ वाढता असल्याने चेकपोस्टवर जादा कर्मचाऱ्यांची ड्युटी लावणे गरजेचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग प्रशासनाने तसे केले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 मेपासून आजपर्यंत 1 लाख ६० हजार ४३२ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्याची नोंद असून जवळपास दीड लाख चाकरमानी दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'इमारतीमधील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ'