सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज गुरुवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पहाटे ४ ते ५ दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. मालवण शहर आणि परिसरातही सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. लांबलेल्या पावसाने आज अखेर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे.
आकेरीत मुंबई-गोवा मार्गावर कोसळले झाड
जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पहाटेच पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर वारा आणि पाऊस जोरदार सुरु झाल्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळले. त्यामुळे सावंतवाडीहून कुडाळकडे जाणारी वाहतूक व कुडाळहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.