सिंधुदुर्ग - राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सात लाख 83 हजार 592 लोकांपैकी सात लाख 61 हजार 254 लोकांचे सर्वेक्षण झाले असून जिल्ह्यात 97.15 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर कोविडच्या नियमात शिथिलता देण्यात आली असून आता जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर, जिल्ह्यात आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून मात्र, मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा नियमामध्ये शिथिलता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले मात्र, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत व होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सात लाख 83 हजार 592 लोकांपैकी सात लाख 61 हजार 254 लोकांचे सर्वेक्षण झाले असून 97.15 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. या सर्व्हेमध्ये 122 रुग्ण सारी या आजाराचे सापडले असून 390 रुग्ण मलेरिया, डेंग्यू व इतर आजाराचे सापडले आहेत. तर 1,158 जण कोरोना संशयित आढळले. त्यातील 747 लोकांची तपासणी केली असता 299 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती दिली.
दरम्यान, जिल्हयात आतापर्यंत 114 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 2.5 टक्के मृत्यू दर असून तो अजून कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली चौकशी अजिबात मान्य नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त व शासनामार्फत चौकशी सुरू असून या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणी कारवाई होणारच,असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण खात्याशी संबंधीत प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच माध्यमिक शिक्षण विभागाचा जनता दरबार घेणार असेही त्यांनी सांगितले.