सिंधुदुर्ग - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लगबग सुरू आहे. गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतात माणसांची वर्दळ वाढली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात भातशेती बरोबरच भुईमूगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील शेतकऱ्यांमध्ये नगदी पीक म्हणून भुईमूग ओळखला जातो. पावसाने उसंत घेतल्याने सध्या भात लावणीची कामे थांबवण्यात आली आहेत. पाऊस थांबल्याने भूईमूग लागवडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुईमूग पेरणीला सुरुवात केली आहे.
पूर्वी केल्या जाणाऱ्या जास्त कालावधीच्या भुईमुगापेक्षा तीन महिने कालावधीचा भुईमुग जास्त सोईचा आणि कमी त्रासाचा ठरत असल्याने या प्रकारच्या भुईमूग लागवडीचे प्रमाण आहे. भुईमूग शेती शेतकरी वर्गाला डबल फायद्याची ठरते. पाळीव जनावरांसाठी भुईमुगाचा पाला आणि पेंड मिळते, तर शेंगादाण्यांती विक्री होते. यामुळे या शेतीकडे येथील शेतकरी जास्त लक्ष देत आहे.