सिंधुदुर्ग - तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल १९ मे रोजी जाहीर करणार असल्याचे गोव्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने आज (12 मे) स्पष्ट केले आहे. आज कोर्टातील सुनावणीनंतर सरकारी वकील फ्रान्सिस्को टाव्होरा यांनी याची माहिती माध्यमांना दिली. दरम्यान, आजच्या सुनावणीला तरुण तेजपाल स्वतः न्यायालयात उपस्थित होता.
काय आहे प्रकरण?
२०१३मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टच्या आत एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुण तेजपाल याच्यावर आहे. या प्रकरणी गोव्यातील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. स्तर न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. मात्र हा निकाल आता १९ मे रोजी दिला जाईल, असे आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
'कर्मचार्यांच्या अभावामुळे पुन्हा एकदा हा निकाल तहकूब'
'गोव्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने २७ एप्रिल रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यापूर्वी म्हटले होते. पण न्यायाधीश क्षमा जोशी यांनी हा निकाल 12 मेपर्यंत तहकूब केला होता. कोरोनामुळे कर्मचार्यांचा अभाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा निकाल तहकूब करण्यात आला असल्याचे आज कोर्टाने सांगितले. न्यायालय यावेळी केवळ १५ टक्के कर्मचार्यांवर काम करीत आहे', असे सरकारी वकिल फ्रान्सिस्को टाव्होरा यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०१३मध्ये तेजपालविरूद्ध नोंदविला होता गुन्हा
गोवा पोलिसांनी नोव्हेंबर २०१३मध्ये तेजपालविरूद्ध एफआयआर नोंदविला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. २०१४पासून तो जामिनावर बाहेर होता. गोवा गुन्हे शाखेने तेजपाल याच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्याच्यावर आयपीसी कलम ३४१ (चुकीच्या पद्धतीने आडवणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने आडवून ठेवणे), ३५४ (अत्याचार किंवा विनयभंगाचा हेतू असणारी गुन्हेगारी वृत्ती), ३५४-ए (लैंगिक छळ), ३५४-बी (प्राणघातक हल्ल्याचा किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर) ३७६ (२) (एफ) आणि ३७६ (२) (के) (बलात्कार) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी तेजपालने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्यावरील आरोपावर स्थगिती मागितली होती. परंतु त्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
हेही वाचा - ७२ वर्षीय वृद्ध महिला रुग्णालयातून बेपत्ता, पुणे शहरातील घटना
हेही वाचा - सोलापूर - पुणे महामार्गावर थरार; दरोड्यातील आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न