सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यामध्ये गेले काही दिवस टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. यानंतर शनिवारी जाणवली येथे नारायण राणेंचे स्वागत करण्यात आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. त्यावेळी नारायण राणे यांनी तातडीने कार्यकर्त्यांना शांत करत कार्यकर्त्यांसमोरच राजनाथ सिंह यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली व त्यांना यात्रेच्या संदर्भातील माहिती दिली.
माझी तब्येत आता ठणठणीत असून यात्रा ही सुरळीत सुरू असल्याचे यावेळी नारायण राणे यांनी राजनाथ सिंह यांना सांगितले. यावेळी नारायण राणे यांनी काही मिनिटे राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा देखील केली.
विरोधक माझ्या प्रकृतीच्या अफवा पसरवतात -
भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना फोन करून जनआशीर्वाद यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेला लाभणाऱ्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिदाची माहिती दिली. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शनिवारी दुसऱ्या दिवसाची यात्रा सुरू असून आपण त्या यात्रेतून बोलत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच आपली तब्बेत ठणठणीत असून विरोधक माझ्या प्रकृतीच्या अफवा पसरवतात असेही नामदार नारायण राणे यांनी नामदार राजनाथ सिंग यांना सांगितले.
हेही वाचा - त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू; अजित पवारांचं 'या' केंद्रीय मंत्र्यांना प्रत्युत्तर
फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांचा आणखीनच उत्साह वाढला -
जाणवली मारुती मंदिर येथे जनआशीर्वाद यात्रा पोहोचल्यावर स्वागताचा कार्यक्रम सुरू असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा फोन आला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे सर्वच नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. फोन ठेवताच पुन्हा जल्लोष आणि घोषणाबाजी सुरू झाली. फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांचा आणखीनच उत्साह वाढल्याचे पाहायला मिळाले.