सिंधुदुर्ग - जिल्ह्यासह कोकणच्या किनारपट्टीवर गेल्या काही महिन्यात १० डॉल्फिन आणि २ महाकाय व्हेल मासे मृत अवस्थेत सापडले आहेत. त्यावरून कोकणच्या किनाऱ्यावर डॉल्फीनचे प्रजनन वाढत असल्याचे समोर आले आहे, असे अभ्यासक सांगतात. तसेच कासवाचा देखील मृत्यू झाला. जीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे होतात? याचा अभ्यास झाला पाहिजे अशी समुद्री जीवप्रेमींची मागणी आहे.
खोल समुद्रात वास्तव्य करणाऱ्या या माशांना मराठीत देवमासा, तर स्थानिक बोलीभाषेत महाराज अर्थात मोठा मासा असे संबोधले जाते. समुदात दोन प्रकारचे देवमासे आढळतात. एक दात असलेले शिकारी मासे, तर दुसरे दातांऐवजी कंगव्यासारखी अनेक जाळी तोंडात असलेले बलिन देवमासे. एकाच वेळी २० ते ३० हजार लीटर पाणी तोंडात घेऊन ते या कंगव्यामधून बाहेर टाकतात. दरम्यान, या पाण्यातील प्लवक प्राणी म्हणजे झू प्लॅण्टम त्यांच्या तोंडात राहतात. ते त्यांचे खाद्य होते. काहीवेळा समुद्रातील कचरा या प्रक्रियेतून त्यांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे मालवणमधील कृतिशील मच्छिमार आणि मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर सांगतात. तसेच अंधुकृत एलईडी फिशिंग आणि घोष्ट फिशिंगचाही परिणाम या जीवांवर होत असू शकतो, असे पराडकर म्हणाले.
यामुळे माशांचा मृत्यू होण्याची शक्यता -
महासागरातील मासे खाद्यासाठी उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर जातात, तर विणीच्या हंगामात उष्ण कटिबंधात येतात. अरबी समुदातील मासे अशा प्रकारे मोठे स्थलांतर करत नाही. हे मासे ओमानच्या बाजूला तीनशे ते चारशेच्या कळपाने समुद्रात फिरताना दिसतात. ओमानच्या दक्षिण बाजूला सोमालिया देशाजवळ पाण्याचा प्रवाह आहे, त्याला सोमाली करंट म्हणतात. दक्षिण ध्रुवापासून आलेला हा करंट सोमालियाकडून भारतीय उपखंडाकडे येतो. या प्रवाहासोबत देवमासे प्रवास करतात. देवमासे हे सस्तन प्रकारातील असल्याने त्यांच्याकडे पिलांचा सांभाळ केला जातो. आईसोबत लहान देवमासे खाद्याच्या शोधात पश्चिम किनाऱ्यावर येतात. दरम्यानच्या काळात आई मुलांना सोडून गेली किंवा आईपासून ताटातूट झाली की हे लहान देवमासे दिशाहीन होतात. किनाऱ्यावर खाद्यासाठी आलेल्या या पिलांना भरती ओहोटीचे गणित लक्षात येत नाही. ओहोटी सुरू झाली की भारीभरकम वजनामुळे तातडीने मागे फिरणे त्यांना जमत नाही आणि ते अडकून पडतात. याला शास्त्रीय परिभाषेत स्ट्रॅण्डिंग म्हणतात. अशा भरकटलेल्या मोठ्या माशांवर मोठ्या देवामाशांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. किंवा समुद्रात सोनार अॅक्टिव्हिटी सुरू असल्यास त्याचाही परिणाम या माशांवर होऊ शकतो, असे समुद्री जीवअभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.
कोकणच्या किनाऱ्यावर डॉल्फिनचे प्रजनन वाढतेय -
गेल्या काही वर्षांत डॉल्फिन मृतावस्थेत सापडत आहेत, त्यावरून कोकणच्या किनाऱ्यावर डॉल्फिनचे प्रजनन वाढत आहे हे समोर आले आहे. डॉल्फिनचे प्रजनन वाढणे ही बाब समुद्री पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही सकारात्मक बाजूही लक्षात घेतली पाहिजे, असेही डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले. डॉ. कुलकर्णी हे भारतीय स्कुबा ड्रायव्हिंग व जलक्रीडा प्रशिक्षण संस्था या संस्थेचे प्रमुख आहेत.