सिंधुदुर्ग - अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनाऱ्यावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका कोकण किनारपट्टीला बसायला सुरुवात झाली आहे. गोव्यामध्ये पावसाळ्याला सुरवात झाली आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होत आहे. दरम्यान, मच्छीमारांनी समुद्रातून तत्काळ मागे परतावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे.
किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि लाटांचा तडाखा बसला आहे. दरम्यान, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, या वादळाचा परिणाम १५ ते १७ मेच्या सुमारास दक्षिण कोकणसह गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे. तसेच १५ व १६ मे रोजी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा आणि सिंधुदुर्गच्या काही भागात आजच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. किनारी भागात सोसाट्याचे वारे वाहत असून समुद्रालाही मोठे उधाण आले आहे. पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर धडकत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गोमंतकीयांना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचे आवाहन -
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या प्रभावाने गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांनी सतर्क राहावे, असे आवाहन गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे. मच्छिमारांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यांनी हवामान खात्याच्या सूचनेनुसार त्वरित किनाऱ्यावर परत यावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे. तर, या परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
हेही वाचा - 'तौक्ते' चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार, मुसळधार पावसाचा इशारा