सिंधुदुर्ग - जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची कोरोना रॅपिड टेस्ट खारेपाटण चेकपोस्ट परिसरात होणार आहे. त्या अनुषंगाने उभारण्यात येणारी लॅब आणि चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी प्रांत वैशाली राजमाने यांनी आज केली. चेकपोस्टवरच रॅपिड टेस्ट होणार असल्याने चाकरमान्यांसह जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवात सिंधुदुर्गात सुमारे एक ते दीड लाख चाकरमानी दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येचा आढावा घेतला जात आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची रॅपिड टेस्ट करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने खारेपाटण चेकपोस्टवर रॅपिड टेस्ट साठी लॅब, चाकरमान्यांसाठी मंडप व इतर सुविधांची उभारणी केली जात आहे. प्रत्येक चाकरमान्याची टेस्ट झाली तर तो आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करणे शक्य होणार आहे. यातून कोरोनाचा समूह संसर्गदेखील टाळता येणे शक्य होणार आहे. या वेळी तहसीलदार रमेश पवार, मंडल अधिकारी मंगेश यादव, तलाठी रमाकांत डगरे, पोलीस उपनिरीक्षक खंडागळे, सरपंच रमाकांत राऊत, रफिक नाईक उपस्थित होते.
जिल्ह्यात चाकरमान्यांचा ओघ सुरू आहे. गाड्यांच्या रांगा खारेपाटण चेकपोस्टवर आहेत. हा ओघ आणखी वाढणार आहे. मुंबई, पुणे येथे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे समूह संसर्गाचाही धोका जिल्ह्याला आहे. तो कमी व्हावा यासाठी बहुतांश सरपंचांनी १४ दिवस क्वारंटाईनबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधींकडून सात दिवसांची मागणी आहे. याबाबतचा नेमका निर्णय राज्य शासनाकडून येण्याची अपेक्षा आहे.